BDO, BEO, विस्तार अधिकारी अन् केंद्रप्रमुखांचे निलंबन होणार? | 'महाराष्ट्र नागरी सेवा नियमां'नुसार शिस्तभंगाच्या कारवाईचा बडगा उगारणार!
सोमेश्वर नगर (विशेष प्रतिनिधी):
लहान चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि राज्य शासनाच्या अतिमहत्त्वाच्या शासन निर्णयाला (GR) सर्रास केराची टोपली दाखवणाऱ्या बारामती तालुक्यातील भ्रष्ट मनोवृत्तीच्या प्रशासनाविरोधात आता तीव्र संतापाचा उद्रेक झाला आहे. पहिली ते चौथीच्या शाळा सकाळी ९:०० वाजेनंतरच भरवण्याचे स्पष्ट व बंधनकारक आदेश असताना, ZP व संस्थांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक स्वतःच्या सोयीसाठी भल्या पहाटे सकाळी ७:०० ते ७:३० वाजताच बालकांना शाळेत खेचत आहेत. शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या या मनमानी कारभारावर तात्काळ हातोडा पडणार आहे.
या कायद्याची अंमलबजावणी करण्याची वैधानिक जबाबदारी असलेले गट विकास अधिकारी (BDO), गट शिक्षण अधिकारी (BEO), विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख हे केवळ कागदावरच 'कर्तव्यदक्ष' उरले आहेत. प्रत्यक्षात शिक्षक संघटनांच्या दबावापुढे या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे नांगी टाकली असून, स्वतःचे कातडे वाचवण्यासाठी चिमुकल्यांचा शारीरिक व मानसिक छळ उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत.
थेट चौकशी अन् निलंबनाची टांगती तलवार!
शासकीय आदेशांचे उघड उल्लंघन करणे हा 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम' आणि 'शिस्त व अपील नियमां'नुसार गंभीर प्रशासकीय गुन्हेगारी स्वरूपाचा 'कर्तव्यात कसूर' मानला जातो.
"शिक्षक संघटनांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या अधिकाऱ्यांनी आणि मुजोर मुख्याध्यापकांनी आता परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे! शासन निर्णयाला पायदळी तुडवून बालकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या प्रत्येक मुख्याध्यापक, शिक्षक आणि यावर डोळेझाक करणाऱ्या BDO, BEO सह सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी लावून त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित (Suspend) करण्यासाठी मंत्रालयापर्यंत थेट तक्रार दाखल केली जात आहे."
बारामती तालुक्यातील पहिली ते चौथीचे वर्ग उद्यापासूनच सकाळी ९ वाजेनंतरच भरले गेले पाहिजेत; अन्यथा कायदेशीर कारवाईच्या बडग्याने अधिकाऱ्यांची व शिक्षकांची पदे धोक्यात येतील, असा थेट आणि कडक इशारा देण्यात आला आहे.
