वडगाव निंबाळकर:
निरा–बारामती रस्त्यावरून धावणाऱ्या शेकडो वाहनांकडून वाहतुकीच्या नियमांची उघडउघड पायमल्ली होत असल्याचे चित्र समोर आले आहे. या मार्गावर अनेक चारचाकी वाहनांना काळी फिल्म (ब्लॅक पेपर) लावणे, फॅन्सी नंबर प्लेट्स वापरणे, तसेच काही वाहनांवर तर नंबर प्लेटच नसणे असे गंभीर प्रकार सर्रास सुरू आहेत. विशेष म्हणजे, हा रस्ता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीच्या हद्दीत येत असूनही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक नागरिकांनी तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास सत्य येईल समोर
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव निंबाळकर ते लिंबूत या दरम्यानच्या मार्गावर स्थानिक ग्रामपंचायतींनी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. जर पोलीस प्रशासनाने या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज गांभीर्याने तपासले, तर नियमभंग करणाऱ्या अशा शेकडो संशयास्पद वाहनांची मोठी संख्या आणि त्यांचे रेकॉर्ड समोर येऊ शकते, असा दावा नागरिकांकडून केला जात आहे.
पोलिसांना वाहने दिसत नाहीत का? नागरिकांचा सवाल
इतक्या मोठ्या प्रमाणात नियमबाह्य वाहने रोज या मुख्य मार्गावरून ये-जा करत असतानाही संबंधित वाहनचालकांवर कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई होताना दिसत नाही. यामुळे "पोलीस प्रशासनाला ही वाहने दिसत नाहीत का, की जाणूनबुजून याकडे कानाडोळा केला जात आहे?" अशी जाहीर चर्चा आता परिसरात रंगू लागली आहे. अशा वाहनांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
नागरिकांची मागणी:
"वाहतुकीचे नियम हे सर्वसामान्य नागरिक असो की कोणीही, सर्वांसाठी समान आहेत. त्यामुळे काळी फिल्म, बेकायदेशीर फॅन्सी नंबर प्लेट आणि नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर पोलिसांनी तात्काळ विशेष मोहीम राबवून कठोर दंडात्मक कारवाई करावी."
या वाढत्या नियमभंगामुळे मार्गावरील सुरक्षितता धोक्यात आली असून, आता तरी वडगाव निंबाळकर पोलीस प्रशासन झोपेतून जागे होऊन या 'व्हीआयपी' स्टाईलने फिरणाऱ्या नियमभंग करणाऱ्यांवर 'खाकी'चा इंगा दाखवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
