सोमेश्वरनगर प्रतिनिधी :
वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करंजेपूल पोलीस चौकीअंतर्गत येणाऱ्या मौजे मुर्टी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तीन पानी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. २६ ऑगस्ट २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ६ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण ४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या आरोपींवर झाली कारवाई:
* चंद्रकांत यशवंत कुचेकर (वय ५०, रा. मोरगाव)
* उमेश सत्यवान कांबळे (वय ५४, रा. मोरगाव)
* संदीप ग्यानबा गायकवाड (वय ४४, रा. मोरगाव)
* संपत चंदर बालगुडे (वय ५४, रा. मुर्टी)
* दत्तात्रय पोपट गायकवाड (वय ३३, रा. पणदरे)
* सुरेश सदाशिव पवार (वय ५२, रा. करंजेपूल)
मुद्देमाल हस्तगत व गुन्हा दाखल:
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून ४,१५० रुपये रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारी १०० रुपये किमतीची पत्त्यांची दोन कॅट, असा एकूण ४,२५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी सर्व आरोपींविरुद्ध मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा (गु. रजि. नं. १६६/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
आशीर्वाद देणाऱ्या 'आकां'वर कारवाई होणार का? नागरिकांत चर्चा गरम:
या घटनेचा पुढील तपास करंजेपूल पोलीस चौकीचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक वारुळे करत आहेत. मात्र, या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. करंजेपूल पोलीस चौकीच्या हद्दीत अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध जपणारे राजकीय कार्यकर्ते आणि त्यांना अभय देणारे वरिष्ठ अधिकारी यांच्यावरही कारवाई होणार का? की हा तपास केवळ लहान माशांवर कारवाई करून थांबणार, असा सवाल परिसरातील जागृत नागरिकांकडून विचारला जात आहे.
